Tiranga Times Maharastra
राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना या योजनेंतर्गत दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते.
मात्र आता या योजनेबाबत चिंतेची बातमी समोर आली आहे. नगर परिषद, नगर पंचायत आणि त्यानंतर लागलेल्या महापालिका निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे हप्त्यांच्या वितरणावर परिणाम झाला होता. नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरमध्ये तर डिसेंबरचा हप्ता जानेवारीमध्ये मिळाला.
दरम्यान, जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे “लाडक्या बहिणींचे पैसे थांबवले का?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्यभरातील लाखो महिलांचे लक्ष या हप्त्याकडे लागले असून महिलांमध्ये चिंता वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक प्रक्रियेनंतर लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी सुरू असून अपात्र लाभार्थी वगळण्याची प्रक्रिया चालू आहे. याच कारणामुळे काही जिल्ह्यांमध्ये हप्ता उशिरा मिळत असल्याचे सांगितले जात आहे.
